विटा : नियोजित शक्तीपीठ महामार्ग माहुली गावात खानापूर तालुक्यात प्रवेश करणार तेथून वळखड- चिखलहोळ-नागेवाडी-भाग्यनगर-घानवड-हिंगणगादे-भाळवणीहून पुढे कडेगाव तालुक्यात प्रवेश करणार आहे. शक्तीपीठ महामार्गात खानापूर तालुक्यातील ८ गावातील जवळपास १हजार शेतकऱ्यांची ५५५ एकर जमीन जाणार आहे. याबाबत शेतकऱ्यांनी एकजूट करून या महामार्गाला विरोध करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन बाबासाहेब मुळीक यांनी केले.
शक्तीपीठ महामार्गाबाबत जनजागृती करणेसाठी भाग्यनगर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बोलताना मुळीक म्हणाले, यापूर्वी माहुली गावातील टेभूची विहीर, एमएसईबीचे सबस्टेशन, पंपहाउस, टेंभू मुख्यकालवा, बारामती-सांगली रस्ता रुंदीकरण व टेंभू स्लाबमुळे अगोदरच माहुली गावातील २५० ते ३०० एकर जमीन गेलेली आहे. उमरकांचन या गावाचे पुनर्वसन माहुली गावात झालेले आहे याशिवाय ग्रीनफिल्ड हायवे माहुली गावातून जाणार आहे. असे असताना शक्तीपीठ महामार्गासाठी माहुली गावातील ७३ गटातील ४५ हेक्टर म्हणजेच ११२.५० एकर जमीन संपादित करण्याचा घाट शासनाने घातला आहे.
. भाग्यनगर गावाची यापूर्वी तलावात जमीन गेलेली आहे. आता ९० गटातील ३९.७५ हेक्टर म्हणजे १३७ एकर जमीन शक्तीपीठ महामार्गात जाणार आहे. नागेवाडी, घानवड गावातील शेतकऱ्यांनी यापूर्वी यशवंत साखर कारखाना, सूतगिरणी, टेक्सटाइल पार्क यासाठी जमीन दिलेली आहे तर सांगली-बारामती हायवेच्या रुंदीकरणात जमीन गेलेली आहे. नागेवाडी व घानवड गावातील अनुक्रमे ५२ व १०६ गटातील ५०-५० एकर जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित होणार आहे. भाळवणी गावात ताकारी मुख्य कालव्यासाठी जमीन गेलेली आहे. आता शक्तीपीठ महामार्गासाठी ८८ गटातील १४५ एकर जमीन संपादित केली जाणार आहे. चिखलहोळ मधील ३६ एकर, हिंगणगादे मधील २४.५० एकर जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे.
याशिवाय या सर्व गावात टेंभू स्लाबमुळे शेतकऱ्यांची ८ एकर वरील जमीन संपादित झालेली आहे. त्यामुळे ८ एकरात दोन-तीन भावाभावात वाटण्या होऊन आधीच दोन-तीन एकर शेती शेतकऱ्यांकडे राहिलेली आहे. त्यात आणखी शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादन झाल्यास अनेक शेतकरी भूमीहीन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा नागपूर रत्नागिरी एनएच 166 हा ९२५ किमीचा महामार्ग तुळजापूर, माहूर, कोल्हापूर या प्रमुख देवस्थानांच्या जवळून जात असताना शासनाने नव्याने शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट घातला आहे. पूर्वीचा शक्तीपीठ महामार्ग ८०२ किमीचा प्रस्तावित होता. हा मार्ग शेटफळे- बानुरगड- जरंडी- कवलापूर-बुधगाव असा जात होता. त्यास नदीकाठच्या शेतकऱ्यांनी विरोध केल्याने तो रद्द करून त्या गावांनी नाकारलेला मार्ग बदलून नवीन ८५६ किमीचा हा महामार्ग आपल्या तालुक्याकडून वळविला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी जागरूक होऊन लढा उभा करणे गरजेचे आहे असे मत बाबासाहेब मुळीक यांनी व्यक्त केले.
यावेळी रोहित काटकर, दीपक काटकर, रवी काटकर यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी किसनराव जानकर, संग्राम देशमुख, नागेवाडी सोसायटीचे चेअरमन संभाजी निकम, संपतराव यादव, संपतआण्णा निकम, जयराम जगताप, प्रेमानंद जगताप, संताजी जगताप, तानाजी काटकर, संतोष जगताप, सोन्याभाऊ, आबासो जगताप, भिमराव निकम, बाबुराव जगताप, जगन्नाथ काटकर, भिमराव जगताप, पतंगराव काटकर, पोपट जगताप, चंद्रकांत जगताप, सुरेश जगताप यांच्यासह नागेवाडी, भाग्यनगर येथील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.
Post a Comment