आटपाडीत रस्त्यावरून भाजप शिवसेनेत शह कटशहाचे राजकारण रंगले

आटपाडी - शहरातून जाणाऱ्या जिल्हा मार्गाच्या साईमंदिर चौक ते आण्णाभाऊ साठे चौकापर्यंत रस्ता रुंदीकरणावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष पेटला आहे. रस्त्याची रुंदी ११ मीटर की १४ मीटर असावी,या मुद्यावरून दोन्ही पक्षांचे नेते आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने विकासकामात अडथळा निर्माण झाला असून नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.   
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मंजूर झालेले काम हे १० मीटर डांबरी रस्ता, दोन्ही बाजूंना १.५ - १.५ मीटरची गटारं आणि त्यानंतर पाईपलाईन दोन्ही बाजूने दोन दोन फुट जागा व विजेच्या पोलसाठी काही जागा राखीव ठेवण्याचे आहे. मात्र, प्रत्यक्षात कामात अनेक ठिकाणी तफावत आढळत असल्याचा आरोप आहे. बस स्थानकापासून गटारीची रुंदी कमी करण्यात आली आहे तसेच पाईपलाईन आणि पोलसाठी आवश्यक जागाच ठेवलेली  नाही.                               शहराचा भविष्यातील विस्तार लक्षात घेता रस्ता १४ मीटर रुंद असावा, तेवढी जागा ताब्यात घ्यावी, जेणेकरून भविष्यात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवणार नाही, अशी शिवसेनेची मागणी आहे. त्याप्रमाणे बांधकाम विभागाने काम सुरू करताना मोजमापे घेऊन खुणा केल्या होत्या.
 तेथील परिस्थिती आणि तांत्रिक बाबींचा विचार करून नियमाप्रमाणे रस्ता ११ मीटरचाच  असावा, यावर भाजप नेते आग्रही आहेत.                         सध्या सुरू असलेल्या कामाच्या एका बाजूला गावठाण असून दुसऱ्या बाजूला शेतजमीन आहे. गावठाण भागात मोठ्या प्रमाणावर पक्की अतिक्रमणे झाली असल्याने रस्ता सरकवण्यास मर्यादा येत आहेत. दुसरीकडे, नियमानुसार शेतजमिनीकडे रस्त्याच्या मध्यभागापासून ७५ फूट जागा सोडून बांधकाम करणे अनिवार्य असताना, अनेक ठिकाणी या नियमाचे उल्लंघन केले  आहे.                      शासकीय अध्यादेशानुसार, जिल्हा मार्गाची रुंदी ही किमान पंधरा मीटर असणे अपेक्षित असते, त्यानंतर गटार आणि इतर सुविधांचा समावेश होतो. सध्या आकरा मिटर रूदीने रस्ता मजूर असला तरी काही दिवसात रस्ता रूंदीकरण केले जाते त्यासाठी जागा आत्ताच सोडण्याची गरज आहे. मात्र आटपाडीत या निकषांची पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे.  रस्त्याच्या रुंदीवरून सुरू असलेल्या वादामुळे काम थांबले आहे. केवळ 'रस्ता किती मोठा असावा' या वादापेक्षा दोन्ही बाजूंची अनधिकृत अतिक्रमणे काढून रस्ता नियमानुसार मोकळा करणे अधिक गरजेचे आहे. शहराचे भविष्य आणि वाढती वाहतूक पाहता, दोन्ही पक्षांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वसमावेशक तोडगा काढल्यास आटपाडीकरांची वाहतूक कोंडीतून कायमस्वरूपी सुटका होऊ शकेल.                       चौकट- येथे रस्त्याच्या दुसऱ्या शेतजमिनी बाजूकडे एन. ए. साठी मंजुरी देतानाच जिल्हा मार्गाच्या मध्यभागापासून 75 फूट लांब बांधकाम करण्यास परवानगी दिली आहे. त्यापुढची जागा रस्त्यासाठीच राखीव ठेवलेली असते.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...