सातारा : सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत अखेर महायुतीत एकमत झाल्याचं वृत्त समोर येत आहे. साताऱ्यात महायुतीमधील नेत्यांच्या वादाची इतिहासात नोंद व्हावी, अशा घटना गेल्या काही महिन्यांमध्ये घडल्या आहेत. महायुतीतला संघर्ष विधान परिषद निवडणुकीतही कायम बघायला मिळत होता. पण महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर सातारा-सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत एकमत होताना दिसत आहे. तीनही पक्षांच्या स्थानिक नेत्यांना जुळवून घेण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सातारा-सांगली विधान परिषदेचा महायुतीतला वाद अखेर थांबला आहे.
satara politics
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सातारा-सांगलीच्या जागेवरुन सुरु असलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. या बैठकीनंतर स्थानिक नेत्यांना एकत्रित काम करण्याच्या सूचना महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहेत, अशी माहिती समोर येत आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांकडून कुठेच क्रॉस व्होटींग होणार नाही याबाबतचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.
सातारा आणि सांगलीत महायुतीच्या घटक पक्षांची ताकद आहे. दोन्ही ठिकाणी महायुतीच्या पक्षांकडे सर्वाधिक जागा आहेत. पण स्थानिक महायुतीच्या नेत्यांमध्ये सुरु असलेल्या कुरबुरींमुळे कदाचित विधान परिषद निवडणुकीत फटका बसू शकतो. हा संभाव्य धोका लक्षात घेता महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातोय.
सातारा-सांगली विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. भाजप नेत्यांकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना विश्वासात घेतलं जात नाही, अशी खंत शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली होती. तसेच महायुतीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची अनुपस्थिती होती, असं देखील वृत्त समोर आलं होतं. त्यामुळे सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा उमेदवार जिंकणार की नाही? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात संघर्ष बघायला मिळाला. यावेळी पोलीस बळाचा वापर करुन झालेल्या धक्काबुक्कीत मंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला इजा झाली होती. तसेच मंत्री मकरंद पाटील यांनाही या धक्काबुक्कीत धक्का लागला होता. या घटनेचा वचपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते विधान परिषदेच्या निवडणुकीतून काढणार का? अशी देखील चर्चा आहे. या सर्व घडामोडींदरम्यान वरिष्ठ पातळीवर हालचाली घडल्याची माहिती मिळत आहे. वरिष्ठ पातळीवरुन सूचना मिळाल्या असल्या तरी स्थानिक पातळीवर काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्वाचं असणार आहे.
'
إرسال تعليق