⚡ ब्रेकिंग News

भाजपच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसचा एल्गार; ईश्वरपूर, आटपाडी आणि विटा येथे 'संघटन सृजन'चा हुंकार!

 सांगली: "आजच्या सत्ताधारी भाजपच्या कारभारामुळे लोकशाही मूल्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विरोधकांवर दबाव टाकणे आणि सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची प्रवृत्ती वाढली आहे. या दडपशाहीला उत्तर देण्यासाठी काँग्रेस पक्ष आता नवीन ऊर्जा आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर जनतेसमोर सक्षम पर्याय म्हणून उभा ठाकेल," असा विश्वास माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी व्यक्त केला.सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर, आटपाडी आणि विटा येथे काँग्रेसच्या “संघटन सृजन अभियान” अंतर्गत विशेष बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकींना केंद्रीय निरीक्षक मा. आ. थोटा लक्ष्मीकांत राव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यकर्त्यांच्या सूचनांना प्राधान्य:
या दौऱ्यादरम्यान केंद्रीय निरीक्षक आणि विक्रमसिंह सावंत यांनी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवरांशी थेट संवाद साधला. आगामी काळातील राजकीय आव्हानांना ठामपणे सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी मांडलेल्या सूचनांना प्राधान्य देण्यात आले. पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचवून अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात आला.बैठकीत बोलताना विक्रमसिंह सावंत यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, "माध्यमांवर नियंत्रण मिळवून आणि लोकशाहीची पायमल्ली करून सत्ता राबवली जात आहे. अशा काळात काँग्रेस पक्ष अधिक जबाबदारीने पारदर्शक आणि लोकाभिमुख राजकारणाचा मार्ग स्वीकारत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे."
नवे नेतृत्व, नवी ऊर्जा:
येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष नवीन नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या ठाम विश्वासाच्या जोरावर विजयाचा मार्ग प्रशस्त करेल. जनतेचा विश्वास संपादन करून काँग्रेस पुन्हा एकदा राज्याला विकासाच्या वाटेवर नेईल, असा सूर या बैठकांमधून उमटला. याप्रसंगी काँग्रेसचे विविध सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...