इस्लामपूर / प्रतिनिधी:वाळवा तालुक्यातील जुनेखेड येथे काल रात्री कौटुंबिक कलह आणि आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून एका तरुणाचा विळ्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. कपिल झाजम्या पवार (वय ३५, रा. जुनेखेड, ता. वाळवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण वाळवा तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून परिसर हादरून गेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मृताचे वडील झाजम्या कस्तान्या पवार (वय ६५) आणि मोठा भाऊ अजय झाजम्या पवार (वय ४५) या दोघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे.
पैशांचा वाद ठरला जीवघेणापोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत कपिल पवार आणि त्याचा मोठा भाऊ अजय व वडील झाजम्या पवार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होते. त्यातच त्यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाणीवरूनही मोठ्या प्रमाणावर मतभेद निर्माण झाले होते. काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास याच आर्थिक व्यवहारावरून त्यांच्यात पुन्हा कडाक्याचे भांडण झाले.विळ्याने केले सपासप वारहा वाद इतका विकोपाला गेला की, संशयित आरोपी अजय आणि वडील झाजम्या यांनी रागाच्या भरात घरात असलेला विळा हातात घेतला. त्यांनी कपिलवर विळ्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. डोक्यावर आणि शरीरावर गंभीर वार झाल्यामुळे अतिरक्तस्राव होऊन कपिलचा जागीच तडफडून मृत्यू झाला. घरामध्ये रक्ताचा सडा पडला होता.पोलीस यंत्रणा सतर्क, दोघे ताब्यातया घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सहकाऱ्यांसह तात्काळ जुनेखेड येथील घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत संशयित आरोपी भाऊ अजय पवार आणि वडील झाजम्या पवार यांना घरातूनच ताब्यात घेतले. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या घटनेचा पुढील सविस्तर तपास पोलीस करत आहेत.
Post a Comment