तालुक्यातील मौजे शेटफळे येथील शुक्र ओढा पात्रालगत अनधिकृतरीत्या करण्यात आलेल्या वाळू साठ्यावर महसूल विभागाने धडाकेबाज कारवाई करत अंदाजे दोन ब्रास वाळू जप्त केली. दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली.
या संदर्भात अनधिकृत वाळू साठ्याची तक्रार महसूल प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार श्रीमती शितल बंडगर यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यांच्या निर्देशानुसार महसूल विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी धाड टाकून पाहणी केली असता सुमारे दोन ब्रास वाळूचा बेकायदेशीर साठा आढळून आला.
सदर वाळू जप्त करून शासनाच्या ताब्यात घेण्यात आली असून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी ती तहसील कार्यालय, आटपाडी येथे जमा करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल संहिता तसेच इतर लागू नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली.
अनधिकृत वाळू उपसा, साठा व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाकडून नियमित तपासणी मोहिमा राबविण्यात येत असून अशा बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, नागरिकांनी त्यांच्या परिसरात अनधिकृत वाळू उपसा किंवा साठा आढळल्यास तात्काळ महसूल विभागास माहिती देण्याचे आवाहन तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment