आटपाडी ता.1 -दिंघची पेट्रोल पंप अपहार प्रकरणी विरोधकांनी चालवलेला अपप्रचार केवळ प्रसिद्धीचा स्टंट आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने संचालक दादासाहेब हुबाले बाजार समितीची नाहक बदनामी करत आहेत," अशा जळजळीत शब्दांत सभापती संतोष पुजारी यांनी हुबालेंच्या आरोपांचा समाचार घेतला. येथील बाजार समितीच्या दिघची पंपावर 8 मे 2025 रोजी केलेल्या तपासणीत 19 लाखाचा अपहार उघड झाला होता. त्यावेळी संबंधीतांनी काही रक्कम भरली, मात्र उर्वरित रक्कम भरण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे शेवटी सचिव शशिकांत जाधव यांनी 16 फेब्रुवारी तिघांवर अपहराचा लाख गुन्हा दाखल केला. त्यानंतर जागे झालेले दादासाहेब हुबाले यांनी 21 फेब्रुवारीला प्रसिद्ध माध्यमांसमोर हे जाहीर केले. वास्तविक त्याअगोदरच गुन्हे दाखल केले होते,असे सभापती संतोष पुजारी यांनी सांगितले.
श्री.पुजारी म्हणाले,"संबंधीतावर गुन्हे दाखल केलेत. काहीही लपवलेले नाही. सत्य समोर येण्यासाठी बाजार समितीने जिल्हा उपनिबंधकांकडे ठराव देऊन पंपाचे सुरुवातीपासूनचे शासकीय ऑडिट सुरू केले आहे. यात जो दोषी आढळेल, मग तो कर्मचारी असो किंवा संचालक, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल," अशी ठाम भूमिका मांडली.
ते म्हणाले ," माहिती न घेता केवळ चर्चेत राहण्यासाठी हुबाले चुकीचे आरोप करत आहेत. त्यांना प्रसिद्धीची हौस आणि स्टंटबाजी करण्याचा छंद आहे. उलट संबंधिताशी त्यांनी वारंवार संपर्क साधून पैसे भरू नका म्हणून पाठीशी घालण्याचे काम चालवले आहे. त्यातच जिल्हा परिषद निवडणुकी त्यांचा पराभव झाला. शिवाय स्वतःच्याच गावात लोकांनी मोठ्या फरकाने नाकारल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्याच भावनेतून ते बाजार समितीचे बदनामी करत असल्याचे श्री. पुजारी यांनी सांगितले.
Post a Comment