आटपाडी:आटपाडी तालुक्यातील डाळिंब शेतीला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना डाळिंब शेतीत नविन आलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा उत्साहात पार पडला. शेतकऱ्यांनी सोलापूर येथील डाळिंब संशोधन केंद्राला भेट देऊन डाळिंब शेतीचे धडे गिरवले. रीनाती ऍग्रो आणि महाराष्ट्र कृषी सेवा उद्योग समूह यांनी संयुक्तपणे या दौऱ्याचे नियोजन केले होते. यात तालुक्यातील ५० अनुभवी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
दौऱ्याच्या पहिल्या सत्रात शेतकऱ्यांनी सोलापूर येथील रीनाती ऍग्रो कंपनीच्या अत्याधुनिक प्रयोगशाळेला भेट दिली. यावेळी कंपनीचे कार्यकारी अधिकारी अजित पाटील यांनी डाळिंब बागेत जैविक खतांचे महत्त्व विशद केले. "जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि झाडांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रासायनिक खतांना जैविक पर्यायांची जोड देणे काळाची गरज आहे," असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.
दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांनी सोलापूर येथील डाळिंब संशोधन केंद्राला भेट दिली. येथील शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ पोखरे यांनी शेतकऱ्यांना डाळिंब लागवडीपासून ते हंगाम धरण्यापर्यंतच्या तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या. विशेषता डाळिंबावरील प्रमुख संकटे मानल्या जाणाऱ्या तेल्या,पिन बोरर (खोडकिडा) आणि मर रोगावर सविस्तर उपाययोजना सुचवल्या. त्यानंतर संशोधन केंद्रातील प्रायोगिक बागांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील व्यवस्थापन तंत्र समजून घेतले.
आटपाडी तालुक्यातील डाळिंब बागा सध्या हवामान बदल आणि विविध रोगांमुळे संकटात आहेत. अशा परिस्थितीत या अभ्यास दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना नवीन उभारी मिळेल असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र कृषी सेवा केंद्राचे अक्षय सागर यांनी सर्व सहभागी शेतकरी आणि मार्गदर्शकांचे आभार मानले.
Post a Comment