आटपाडी : तळेवाडी ता. आटपाडी येथील जिल्हा परिषद शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात इयत्ता पहिलीमध्ये नव्याने दाखल झालेल्या चिमुकल्यांचे स्वागत चक्क फुलांनी सजवलेल्या बैलगाडीत बसवून मिरवणूकीने केली. गावातून ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या या अनोख्या मिरवणुकीमुळे बालकांचा शाळेचा पहिला दिवस कायमचा अविस्मरणीय ठरला.
शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांच्या मनात शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, तसेच अनोळखी वातावरणाची भीती दूर व्हावी, या उद्देशाने या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गावातून निघालेल्या या भव्य स्वागत फेरीत ग्रामस्थ, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बैलगाडी सजवून त्यामध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना बसवून वाद्याच्या गजरात गावातून मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढली. या मिरवणुकीने गावकऱ्यांचे लक्ष वेधले. गावातील प्रमुख मार्गावरून फिरून ही फेरी शाळेच्या प्रांगणात आली. फेरीनंतर झालेल्या मुख्य कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना शासनाकडून आलेली नवीन मोफत पाठ्यपुस्तके देऊन सन्मानित केले.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पंचायत समिती सदस्या सौ. सुनिता सरगर उपस्थित होत्या. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा तळेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच नानासाहेब सरगर, उपसरपंच सुरेश कांबळे, माजी उपसरपंच सदाशिव शिंदे, तळेवाडी विकास सोसायटीचे अध्यक्ष बिरा सातपुते यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याचे नियोजन मुख्याध्यापक हणमंत दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिलकुमार थोरात, हुसेनबी नदाफ, इंताब इनामदार, यशवंत म्हारगुडे आणि गजानन अंतरकर यांनी केले होते. कृतीशील शिक्षकांमुळे आणि ग्रामस्थांच्या सहभागामुळे तळेवाडी शाळेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फोटो तळेवाडी ता. आटपाडी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढून केले.
Post a Comment