उमदी/माडग्याळ : लग्न लावून देण्याचा तगादा लावलेल्या एका मुलाने रागाच्या भरात आणि दारूच्या नशेत आपल्या जन्मदात्या वडिलांचा डोक्यात दगड घालून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जत तालुक्यातील लकडेवाडी येथे गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही रक्तलांछित घटना घडली. खंडू भिसे (वय ५०) असे मृत वडिलांचे नाव असून, उमदी पोलिसांनी आरोपी मुलगा पृथ्वीराज भिसे याला तातडीने ताब्यात घेतले आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लकडेवाडी येथील खंडू भिसे आणि त्यांचा मुलगा पृथ्वीराज यांच्यात गेल्या काही दिवसांपासून लग्नावरून सतत वाद होत होते. "माझे लग्न लावून द्या," असा तगादा पृथ्वीराजने वडिलांकडे लावला होता. मात्र, घरगुती कारणांमुळे लग्न जमण्यात अडचणी येत असल्याने त्यांच्यात वारंवार खटके उडत होतेगुरुवारी सायंकाळी पृथ्वीराज हा दारू पिऊन घरी आला. नशेत असलेल्या पृथ्वीराजने पुन्हा लग्नाचा विषय काढून वडिलांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. "माझे लग्न का लावून देत नाही?" असे म्हणत त्याने वाद उकरून काढला. पाहता पाहता हा वाद कमालीचा विकोपाला गेला. यावेळी संतापलेल्या पृथ्वीराजने जवळच असलेला एक मोठा दगड उचलून थेट वडील खंडू भिसे यांच्या डोक्यात घातला. हा वार इतका भीषण होता की, खंडू भिसे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी मुलाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे
लग्न लावून देत नसल्याने जन्मदात्याचा खून; जत तालुक्यातील घटना
पॉलिटिक्स 24 न्यूज
0
Post a Comment