आटपाडी ता.२ : क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचा १४ वा स्मृतिदिन, यानिमित्ताने श्रमिक मुक्ती दल- पाणी संघर्ष चळवळ, सोप्पेकॉम् यांच्या वतीने आटपाडी तालुक्यातील झरे, लेंगरेवाडी, घाणंद, करगणी, खरसुंडी, तडवळे, मापटेमळा या ठिकाणी आदरांजली वाहण्यात आली.
१९९३ साली आटपाडी तालुका हा पाणी देण्याच्या कोणत्याच योजनेत समाविष्ट नव्हता. तालुक्यातील जाणते कार्यकर्ते व पत्रकार यांच्या निमंत्रणाने डॉ. पाटणकर, व क्रांतिवीर नागनाथअण्णा हे बैठकीस गेले असता कार्यकर्त्यांची असणारी चुकीची समजूत दुर करून कृष्णा नदीतूनच आटपाडी तालुक्यात पाणी येऊ शकते, आणि ते मिळवायचेच असा निर्धार करून चळवळ उभी केली.
निंबवडे रोडवरील रेस्टहाऊस समोर तंबू उभा केला, आणि "शेतात पाणी बघणार, मगच चळवळ थांबणार" अशी घोषणा देऊन लढ्याला सुरुवात केली. सभा घेणाऱ्या आठ टीम करून आणि रोज आठ सभा घेऊन संपूर्ण तालुका ढवळून काढला. यामध्ये प्रामुख्याने क्रांतिवीर नागनाथअण्णा, डॉ. भारत पाटणकर, कॉ. नाना शेटे, कॉ. धैर्यशील पाटील, प्रा. बाबूराव गुरव, कॉ. जयंत निकम, यांच्यासह तालुक्यातील व बाहेरील कार्यकर्ते सहभागी होते. ११ जुलै १९९२ ला भवानी हायस्कूलच्या मैदानावर ५० हजार स्त्री पुरुष, विद्यार्थी, विद्यार्थीनीसह परिषद घेऊन सरकारला इशारा दिला.
यामुळेच आटपाडी तालुक्याचा टेम्भू योजनेत समाविष्ट करून पाणी देण्याचे शासनाला मान्य करावे लागले. दरवर्षी परिषदा, मानवी साखळी, साराबंदी, सर्व ग्रामपंचायत, सोसायट्या ठराव, अठरा वर्षावरील सर्व स्त्री-पुरुषांच्या सह्या, दुष्काळी १३ तालुक्यांच्या परिषदा या सर्व परिणामी पाणी देण्याच्या योजनांची कामे सुरू झाली. या सर्व प्रक्रियेत क्रांतिवीर नागनाथअण्णा यांनी सर्व शक्तीनिशी नेतृत्व केले आहे. त्यांच्या या दूरदृष्टी मुळेच आज आटपाडी तालुक्यात पाणी दिसत असून त्यांच्या ऋणातून तालुका कधीही मुक्त होणार नाही असे मत अनेक कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी व्यक्त केले.
झरे येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर होते. यावेळी संस्थेचे सचिव भीमाशंकर स्वामी सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक देवानंद घोणते सर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
तर करगणी येथे अण्णा सरगर, अंबादास सरगर, उत्तम माने,बाळासो कांबळे उमेश लिमटे, नितीन हेगडे, माऊली गळवे, अमोल माने, प्रशंसा शिरकांडे उपस्थित होते,मापटे मळा येथे बापू फुले, नानासो माळी, अमोल माळी, शंकर ढोले, राजू फुले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.तडवळे येथे सतीश हुबाले, जितेंद्र गिड्डे, प्रकाश शेंडे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
वासुदेव लेंगरे, मधुकर लेंगरे, पोपट मंडले यांच्यासह लेंगरेवाडी येथे गावकरी उपस्थित होते.
Post a Comment