भिलवडी (प्रतिनिधी): गरजवंतांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन त्यांना व्याजाच्या जाळ्यात ओढणाऱ्या खाजगी सावकारीचा एक भीषण प्रकार सांगली जिल्ह्यामध्ये समोर आला आहे. माधवाडी (ता. पलुस) येथील एका सामान्य व्यक्तीला केवळ दीड लाखाच्या कर्जापोटी तब्बल तीन लाख रुपये व्याजाची मागणी करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या जुलमी वसुलीमागे काही स्थानिक राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याची चर्चा आता जोरात सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, माधवाडी येथील एका पीडित व्यक्तीने आपल्या अडीअडचणीसाठी एका खाजगी सावकाराकडून टप्प्याटप्प्याने एकूण १ लाख ६५ हजार रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाची मुद्दल फेडण्यासाठी पीडिताने शक्य ते सर्व प्रयत्न केले. मात्र, सावकाराने लावलेल्या अवाढव्य चक्रवाढ व्याजामुळे ही रक्कम कमी होण्याऐवजी वाढतच गेली. आतापर्यंत या व्यक्तीने मुद्दलापेक्षा जास्त रक्कम भरली असूनही, सावकार अजूनही ३ लाख रुपयांच्या व्याजाची मागणी करत तगादा लावत आहेसावकाराच्या दहशतीमुळे पीडित कुटुंबाची अवस्था अत्यंत हलाखीची झाली आहे. व्याजाचे हप्ते फेडण्यासाठी या कुटुंबाला घरातील भांडीकुंडी आणि अंगावरील दागिनेही मोडावे लागले आहेत. इतके करूनही सावकाराची भूक शमत नसल्याने, आता हे कुटुंब गाव सोडण्याच्या मानसिकतेत आहे. "सावकार रात्री-अपरात्री येऊन धमकावतात, आता जगायचे कसे?" असा आर्त सवाल पीडित कुटुंबाने उपस्थित केला आहे.संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सावकारांची वाढलेली हिंमत. अनेक खाजगी सावकार हे राजकीय क्षेत्रातील नेत्यांच्या जवळचे मानले जातात. त्यांच्याच पाठबळावर ही अवैध सावकारी फोफावत असल्याचा संशय नागरिकांमधून व्यक्त होत आहे. "जर राजकीय आशीर्वाद नसेल, तर हे सावकार कायद्याला का घाबरत नाहीत?" असा प्रश्न आता सर्वसामान्य जनता विचारत आहे.जिल्ह्यात पुन्हा एकदा खाजगी सावकारीने डोके वर काढल्याने गरिबांचे जगणे कठीण झाले आहे. या जुलमी आणि बेकायदेशीर सावकारीला वेळीच लगाम घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. जर वेळीच कारवाई झाली नाही, तर अनेक कुटुंबे देशधडाडीला लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दीड लाखाच्या कर्जाला तीन लाखांचे व्याज; खाजगी सावकारीचा विळखा
पॉलिटिक्स 24 न्यूज
0
Post a Comment