खरसुंडी : खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ मंदिर येथील कथित चांदी प्रकरणावरून प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांत विविध चर्चा सुरू असताना गुरव समाजाच्या वतीने कृष्ण मंदिर येथे पत्रकार परिषद घेऊन समाजाची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आली. यावेळी देवस्थान ट्रस्टमध्ये भक्तांकडून दान स्वरूपात येणाऱ्या वस्तूंशी गुरव समाजाचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत पुजारी समाजाची होत असलेली नाहक बदनामी थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.
गुरव समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, गेली शेकडो वर्षे गुरव समाज श्री सिद्धनाथांची नित्य सेवा, पूजा व मंदिराची दिनचर्या पार पाडत आला आहे. मंदिरातील सेवेकरी, मानकरी व भाविक यांच्याशी समन्वय ठेवून कोणतीही तक्रार किंवा वाद निर्माण न होता ही सेवा अखंड सुरू आहे.
पत्रकार परिषदेत पुजारी बांधवांनी सांगितले की, मंदिरातील पूजेचा मान गुरव समाजाला असला तरी खरसुंडी गावात साडेतीनशेहून अधिक गुरव बांधवांची घरे आहेत. काहींना वर्षातून, काहींना दोन किंवा चार वर्षांतून तर काहींना दहा-पंधरा वर्षांतून आठ दिवस पूजेचा मान मिळतो. अत्यंत कमी उत्पन्नाच्या काळातही पुजारी बांधवांनी पदरमोड करून नाथसेवेत खंड पडू दिला नाही, असा इतिहास असल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्या सुरू असलेल्या चांदी प्रकरणामुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जात असून, मंदिरातील पुजाऱ्यांचा देवस्थान ट्रस्टमध्ये जमा होणाऱ्या दानातील वस्तूंशी कोणताही संबंध नसतानाही त्यांच्यावर संशय घेतला जात असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. संबंधित प्रकरणाबाबत देवस्थान ट्रस्टने भाविक व प्रसारमाध्यमांसमोर योग्य तो खुलासा करावा, अशी मागणीही गुरव समाजाच्या वतीने करण्यात आली.
भाविकांमध्ये निर्माण झालेला गैरसमज दूर करण्यासाठी तसेच समाजाची अधिकृत भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचे समाजाच्या वतीने सांगण्यात आले.
या पत्रकार परिषदेस किशोर पुजारी, अर्जुन सावकार, लक्ष्मण पुजारी, महादेव जरंडकर, सुनील पाटील, दत्तात्रय पुजारी, राजू सावकार, तुकाराम पुजारी, विवेक पुजारी, अभिजीत पुजारी, राजू पुणेकर, गजानन पाटील, गजानन पुजारी, किरण पुजारी, चंद्रकांत पुजारी, अमोल पुजारी, अभिषेक सावकार, जगन्नाथ पुजारी, शिवाजी पुजारी, रावसाहेब पुजारी, नरहरी पुजारी, रोहित पुजारी, घनश्याम पुजारी, आदिनाथ पुजारी, सागर पुजारी, प्रवीण पुजारी, कैलास पुजारी, सिद्धेश्वर पुजारी, प्रवीण जरंडकर, अक्षय पुजारी, विशाल पुजारी, रविराज पुजारी, बापूराव पुजारी, प्रशांत जरंडकर, दिगंबर भांगे यांच्यासह गुरव समाजातील अनेक बांधव उपस्थित होते.
Post a Comment