सांगली ( प्रतिनिधी)- सांगली जिल्ह्यातील वाढत्या अवैध धंद्यांविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजेंद्र खरात यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे. त्यासाठी नऊ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी सांगली जिल्हा वाढलेल्या अवैध धंदे आणि गुन्हेगारीला आळा घालण्याबाबतचे जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले आहे.
यात जिल्ह्यात वाळू तस्करी, अमली पदार्थांची विक्री, जुगार, मटका, अवैध दारू, विषारी ताडी आणि बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन यांसारखे व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याची तक्रार केली आहे. यापूर्वी ११ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देऊनही कारवाई केली नाही. उलट, सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी तक्रारदार खरात यांनाच चौकशीची नोटीस पाठवून पोलिसांच्या माध्यमातून त्रास दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. सांगली जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाई करण्याऐवजी तक्रारदाराला त्रास दिला जात असल्याचा खरात यांना अनुभव आला आहे. नऊ मार्च रोजी राजकीय दबावाला बळी न पडता, जिल्ह्यातील दहाही तालुक्यातील कार्यकर्त्यांना एकत्र करून जोपर्यंत हे अवैध धंदे पूर्णपणे बंद होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार राजेंद्र खरात यांनी व्यक्त केला आहे.
Post a Comment