सांगोला ता.4: तालुक्यातील जवळा येथे अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी पहाटे गेलेल्या महसूल प्रशासनाच्या पथकावर वाळू तस्करांनी भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तस्करांनी केलेल्या जोरदार दगडफेकीत महसूल विभागाच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, पथकातील कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. वाळू माफियांच्या वाढत्या दहशतीविरोधात महसूल कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत ‘काम बंद’ आंदोलन पुकारले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवळा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या माहितीच्या मंडल अधिकारी आणि इतर महसुली कर्मचाऱ्यासोबत हे पथक कारवाईसाठी जवळा शिवारात दाखल झाले. प्रशासनाची गाडी पाहताच वाळू तस्करांनी पळून न जाता थेट पथकाच्या गाडीवर दगडफेक सुरू केली. या हल्ल्यात गाडीच्या काचा फुटल्या असून दगड लागल्याने काही कर्मचारी जखमी झाले. वाळू तस्करांनी कारवाईसाठी आलेल्या महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली आहे. तसेच प्रशासनाच्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. थेट सरकारी कामात अडथळा आणून जीवघेणा हल्ला केल्यामुळे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी सांगोला तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी तात्काळ काम बंद ठेवून निषेध नोंदवला. "जोपर्यंत संबंधित वाळू तस्करांना अटक करून त्यांच्यावर मोक्कांतर्गत किंवा कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत कामकाज सुरू करणार नाही," अशी भूमिका कर्मचारी संघटनेने घेतली आहे.
सांगोला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाळू माफियांचे धाडस वाढले असून, त्यांना प्रशासनाचा कोणताही धाक उरला नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. महसूल कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या सत्रामुळे आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेत असून लवकरच अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.
Post a Comment