खरसुंडी (ता. आटपाडी) येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता विकासासाठी मास्टर अबॅकस एज्युकेशन अकॅडमी, बेंगलोर यांच्या नव्या शाखेचा उद्घाटन समारंभ श्री जोगेश्वरी शिक्षण प्रसारक संस्था ,खरसुंडी येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे संचालक श्री. किशोर पुजारी यांनी करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र राज्य संचालक माननीय शिवराज पाटील, फ्रेंचायजी होल्डर सविता भन्साळी, विटा व कराड केंद्राच्या शाखाप्रमुख तथा अबॅकस शिक्षिका प्रिया जोशी, सहाय्यक शिक्षक प्रियांका पवार, श्रद्धा घाडगे, नजीमा शेख तसेच विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवराज पाटील यांनी सांगितले की, पाच ते पंधरा वयोगट हा मुलांच्या मेंदू विकासाचा अत्यंत महत्त्वाचा काळ असून या वयात अबॅकस शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांची एकाग्रता, ग्रहणशक्ती, निर्णय क्षमता, आत्मविश्वास आणि गणिती कौशल्य झपाट्याने वाढते. अबॅकस म्हणजे नियमित सरावामुळे विद्यार्थी कॅल्क्युलेटरपेक्षाही वेगाने बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार तोंडी करू शकतात. या शिक्षण पद्धतीला मराठीत “बुद्धीची व्यायामशाळा” तर इंग्रजीत “ब्रेन जिम” असे संबोधले जाते.
कार्यक्रमादरम्यान आश्रम शाळेतील आठ-दहा विद्यार्थ्यांना केवळ वीस मिनिटांच्या सरावानंतर तोंडी गणिती उदाहरणांचा प्रात्यक्षिक डेमो देण्यात आला. विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या वेगवान गणिती क्षमतेमुळे उपस्थित पालक व नागरिक आश्चर्यचकित झाले. तसेच फिंगर थिअरीच्या माध्यमातून उजव्या-डाव्या हाताच्या बोटांचा वापर करून अचूक उत्तर कसे मिळवता येते, याचे प्रात्यक्षिक प्रिया जोशी यांनी दाखवले.
यावेळी सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक आदिनाथ पिसे यांनी आपल्या मुलगा अभिजीतच्या अनुभवाचे उदाहरण देत अबॅकस शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, अभिजीतने इयत्ता चौथी ते सहावी दरम्यान अबॅकसच्या सात लेव्हल पूर्ण करून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये यश मिळवले. या शिक्षणातून विकसित झालेल्या एकाग्रता व आत्मविश्वासामुळे त्याला पुढील शिक्षणात कोणताही खासगी क्लास लावावा लागला नाही आणि तो आज पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे.
अबॅकस अभ्यासक्रमात एकूण नऊ लेव्हल असून प्रत्येक लेव्हल चार महिन्यांची आहे. आठवड्यातून एकदा ऑफलाईन दोन तास व एकदा ऑनलाईन तास घेण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पालक, नागरिक व विद्यार्थ्यांचे आभार मानून उद्घाटन समारंभाची सांगता करण्यात आली.
Post a Comment