⚡ ब्रेकिंग News

आटपाडी नगरपंचायतीसमोर आरोग्य स्वच्छता आणि पाण्याचेच आव्हान

 आटपाडी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये होऊन तीन वर्षे होतील. प्रशासकीय राजवट संपून लोकनियुक्त कारभारी सत्तेत आले असले, तरी आटपाडीकरांसमोरचे प्रश्न अद्याप 'जैसे थे' आहेत. आरोग्य, स्वच्छता आणि पाणीपुरवठा या मूलभूत समस्यांच्या विळख्यातून शहराला बाहेर काढण्याचे मोठे आव्हान नव्या सत्ताधाऱ्यांसमोर असणार आहे.                        
नगरपंचायतीने नुकतेच महसुली आणि भांडवली उत्पन्नाचा मेळ घालत १०१ कोटी रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर केले आहे. कागदावर हा आकडा मोठा वाटत असला तरी, प्रत्यक्षात या तरतुदींनुसार कामे पूर्ण करणे आणि प्रत्येक रुपयाचा विनियोग पारदर्शकपणे करणे, हेच खरे कौशल्य असणार आहे. निवडणूक झाली कारभार हातात घेतला सत्कार झाले आता चमकोगिरी आणि राजकारण बाजूला ठेवून कारभाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. तरच अंदाजपत्रकाप्रमाणे अचूक कामे होऊन अनेक प्रश्न मार्गी लागतील नाहीतर परिस्थितीचे थे राहील. नगरपंचायतीने महसुली उत्पन्न सहा कोटी पाच लाख दाखवले आहे तर खर्च 9 कोटी 24 लाख दाखवला आहे. इथे उत्पन्नापेक्षा तब्बल तीन कोटीने खर्चच अधिक आहे. त्यामुळे महसुली उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने नगरपंचायतीला कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. तरच खर्चाचा ताळमेळ बसणार आहे. दुसरीकडे भांडवली उत्पन्न 92 कोटी 85 लाख दाखवले असून खर्च 91 कोटी 72 लाख दाखवला आहे. नगरपंचायतीचे सरकारी सात अधिकारी आणि नियमित 13 कर्मचारी असून तब्बल 35 कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यांना महसुली उत्पन्नातून पगार द्यावा लागतो.  
सध्या शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ८५ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या कामातील तांत्रिक त्रुटी दूर करून त्याला गती दिल्यास आटपाडीकरांची अनेक वर्षांची तहान भागू शकते. मात्र, केवळ योजना येऊन चालणार नाही, तर तिचे योग्य नियोजन आणि देखभाल हेच पाणीप्रश्नाचे कायमस्वरूपी उत्तर असेल. सध्या तरी नवीन कारभारी आल्यापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. उलट पाणी उशिराने मिळत असल्याने त्यावर चर्चा सुरू आहे.    
नगरपंचायतीचे महसुली उत्पन्न खर्चाच्या तुलनेत अत्यंत चिंताजनक आहे. हे उत्पन्न वाढवण्यासाठी आता प्रशासनाला काही 'कटू' निर्णय घ्यावे लागणार आहेत. नगरपंचायतीचे ८७ व्यापारी गाळे असून त्यांचे वार्षिक भाडे केवळ १८०० रुपये (म्हणजेच महिना १५० रुपये) आहे.बाजारभावानुसार हे भाडे वाढवल्यास नगरपंचायतीच्या तिजोरीत मोठी भर पडू शकते. आठवडा बाजारातून वर्षाला दोन लाख रुपये उत्पन्न मिळणाऱ्या बाजाराच्या वसुलीत शिस्त आणण्याची गरज आहे.
शहरात केवळ पाणीच नव्हे, तर वाढलेली वाहतूक कोंडी, पार्किंगचा अभाव आणि कचरा व्यवस्थापन हे प्रश्न गंभीर बनले आहेत. 'नमो उद्यान अभियान' आणि 'बटरफ्लाय गार्डन' सारखे प्रकल्प निसर्गाच्या दृष्टीने चांगले असले, तरी सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी प्रशासकीय शिस्त लावणे गरजेचे आहे. सर्व धर्मीय स्मशानभूमींची दुरुस्ती,अंतर्गत रस्तेच 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान' राबवण्याचे नियोजन आहे. सध्या बटरफ्लाय गार्डन आणि पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे.
आटपाडीचा विकास केवळ मोठ्या निधीवर अवलंबून नसून, तो महसुली उत्पन्न वाढवणे आणि प्रशासकीय पारदर्शकता यावर अवलंबून आहे. १०१ कोटींच्या अंदाजपत्रकातील आकड्यांचे रूपांतर प्रत्यक्ष विकासकामात होते की हे प्रश्न पुढच्या वर्षीही 'जुनेच' राहतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. १)2023-24- महसुली व भांडवली उत्पन्न-19 कोटी 19 लाख खर्च सात कोटी 74 लाख. २) 2024- 25-महसुली व भांडवली उत्पन्न 27 कोटी 52 लाख. खर्च 11 कोटी 47 लाख. ३) 2025- 26 महसूल व भांडवली उत्पन्न -68 कोटी 98 लाख. खर्च 67 कोटी 38 लाख. ४) 2026- 27 महसुली व भांडवली उत्पन्न 101 कोटी. खर्च 100 कोटी 97 लाख.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...