⚡ ब्रेकिंग News

शेटफळेतील दुसऱ्या महायुद्धातील तरुणचीा शौर्यगाथा

आटपाडी : वयाची शंभर वर्षे पूर्ण झाली तरी बुद्धी तल्लक, आवाजात करारीपणा आणि आठवणींचा खजिना ताजोतवाना... हे वर्णन आहे शेटफळे (ता. आटपाडी) येथील निवृत्त सैनिक ईश्वर गायकवाड यांचे. दुसऱ्या महायुद्धातील रणधुमाळी असो किंवा भारत-पाकिस्तान फाळणीचा थरार, या सर्व ऐतिहासिक घटनांचे ते केवळ साक्षीदारच नाहीत, तर त्यातील सक्रिय नायकही आहेत. नुकताच त्यांचा १०० वा वाढदिवस शेटफळे येथे माजी सैनिक संघटनेने उत्साहात साजरा केला. आणि हो माणसाला सरासरी जेवढं आयुष्य मिळते तेवढे 71 वर्षे त्यांनी देशाची पेन्शन घेण्याचा जागतिक विक्रमच नोंदवला आहे. ईश्वर गायकवाड यांचा जन्म १० ऑक्टोबर १९२५ रोजीचा आहे. त्याकाळी सारख कुटुंब शेतात राबवत होतो. ब्रिटिशांनी १९४४ मध्ये सांगोला येथे लष्करी भरती काढली होती. गावातील दोन सहकाऱ्यांना सोबत घेऊन ते सांगोलाला चालत गेले. भरतीत सामील झाले. गावाकडे रोज तालमीत कसरती केल्या होत्या. तिथे जोर बैठका आणि साहेब थांबा म्हणेपर्यंत चक्रदंड काढले आणि त्यांची निवड झाली. बेळगाव आणि पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना थेट दुसऱ्या महायुद्धाच्या आखाड्यात उतरवण्यात आले. म्यानमार (बर्मा), सिंगापूर आणि मलेशिया येथील आघाड्यांवर त्यांनी शौर्य गाजवले. विशेष म्हणजे, युद्धात कैद केलेल्या जपानी सैनिकांवर देखरेख ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. युद्ध संपल्यानंतर देशात परत आले. दरम्यान,1947 मध्ये देशाची फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानात अडकलेल्या हिंदू आणि शीख बांधवांना सुरक्षित भारतात आणण्यासाठी भारतीय सैन्याने विशेष मोहीम राबवली होती. ईश्वर गायकवाड या मोहिमेचे महत्त्वाचे घटक होते. रावळपिंडी आणि लाहोर येथील लष्करी छावण्यांमध्ये राहून त्यांनी हजारो निर्वासितांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आणि सुरक्षितपणे भारतात पाठवले. त्या वेळच्या झालेल्या दंगलीतील त्यांच्या तोंडून घटना ऐकताना अंगावर अक्षरशा काटा उभा राहतो. लष्करात अतिरिक्त सैनिक झाल्याने १९५४ मध्ये भारत सरकारने अनेक सैनिकांना सेवानिवृत्त केले. त्यात ईश्वर गायकवाड यांचा समावेश होता. "त्यावेळी मला १० रुपये पगार होता आणि निवृत्तीनंतर केवळ २ रुपये पेन्शन मिळत होती," असे ते आजही अभिमानाने सांगतात. गावी आल्यावर माळवदी घर बांधले आणि काही दिवसानंतर त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने दुकान सुरू केलं. गेली ७१ वर्षे ते सातत्याने पेन्शन घेत असून आज ती ३३ हजार रुपयांवर पोहोचली आहे. तांत्रिक चुकीमुळे त्यांना चुकून बरेच दिवस अतिरिक्त पेन्शन मिळाली होती. हे सरकारच्या उशिराने लक्षात आले. ती रक्कम 33 लाख रुपयांवर होती. त्याची परतफेड म्हणून सध्या त्यांच्या पेन्शनमधून दरमहा १० हजार रुपये कपात केले जातात. ही कपात बरेच वर्षे सुरू आहे. शंभरी ओलांडली तरी गायकवाड यांना रक्तदाब किंवा मधुमेहाचा कोणताही त्रास नाही. आजवर त्यांच्यावर एकही शस्त्रक्रिया झालेली नाही. केवळ दृष्टी कमी झाली असली तरी त्यांची स्मरणशक्ती अफाट आहे. आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाची घटना त्यांना तारखेसह तोंडपाठ आहे. रामायण, महाभारत, लक्ष्मण शक्ती असे अनेक ग्रंथ त्यांचे तोंड पाठ आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी किराणा दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा गाडा समर्थपणे ओढला.
आजच्या पिढीसाठी ईश्वर गायकवाड हे राष्ट्रप्रेम आणि जिद्दीचे चालते-बोलते विद्यापीठ ठरले आहेत. त्यांच्या या गौरवशाली प्रवासाला शेटफळेसह संपूर्ण आटपाडी तालुक्याने सलाम ठोकला आहे. फोटो -1) ईश्वर गायकवाड.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...