आटपाडी ता.24-
खानापूर-आटपाडी मतदारसंघातील लोकप्रतिनिधींच्या हक्कावर गदा आणणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांविरोधात आमदार सुहास बाबर यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला. आटपाडी तालुक्यातील दिघंची-शेटफळे येथे आमदार बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या सबस्टेशनचे उद्घाटन स्थानिक आमदारांना डावलून इतराच्या हस्ते करण्यात आल्याने त्यांनी सभागृहात हक्कभंग प्रस्ताव मांडला. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आटपाडी तालुक्यातील वीज प्रश्न सोडवण्यासाठी आमदार सुहास बाबर यांनी पाठपुरावा करून दिघंची, शेटफळे आणि हिवतड येथे नवीन वीज उपकेंद्र (सबस्टेशन) मंजूर करून आणले होते. त्यासाठी त्यांनी पाठपुरवठा आणि प्रयत्न केले होते. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कोणतीही कल्पना न देता या कामाचा लोकार्पण सोहळा नीता केळकर आणि जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते उरकला. आपल्याच मतदारसंघातील शासकीय कार्यक्रमात स्थानिक आमदाराला अशा प्रकारे डावलले गेल्याबद्दल आमदार सुहास बाबर यांनी विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केला. "शासकीय कार्यक्रमांत लोकप्रतिनिधींना योग्य स्थान मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, मात्र अधिकाऱ्यांनी जानेपूर्वक राजकारण करून प्रोटोकॉलचे उल्लंघन केले आहे," अशी भूमिका मांडली. विटा विभागीय कार्यालयाचे अधिकारी आटपाडी कार्यालयाचे अभियंता आणि सहाय्यक अभियंता यांनी याचे आयोजन केले होते. कसलीही कल्पना न देता दुसऱ्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधीच्या हस्ते उद्घाटन केल्याबद्दल नाराजी व्यक्त केले. मतदारसंघाच्या विकासासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या आमदाराचा हा अपमान असल्याची भावना व्यक्त करत विशेषाधिकार भंगाची सूचना सादर केली.आमदार सुहास बाबर यांच्या मागणीची दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी संबंधित विभागाकडून या प्रकाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर हक्कभंगाची कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहात दिले. या निर्णयामुळे प्रोटोकॉल धाब्यावर बसवणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Post a Comment