आटपाडी ( प्रतिनिधी) अपंग व्यक्तींना दिले जाणारे वैश्विक दिव्यांग ओळखपत्र-युडीआयडी वेळेत प्रशासनाकडे सादर न केल्यास आटपाडीतील प्राथमिक शिक्षकाला निलंबीत करण्यात आहे. आटपाडी जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकमधील भास्कर डिगोळे असे शिक्षकाचे नाव असून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
राज्यातील सर्व शासकीय कार्यालये व विभागांमध्ये युनिक डिसॅबिलिटी आयडी (युडीआयडी) कार्ड सादर करणे सक्तीचे करण्यात आले आहे. राज्यातील शासकीय नोकरीमध्ये अनेक बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा आधार घेतल्याच्या घटना उजेडात आल्या आहेत. बनावट किंवा चुकीच्या वैद्यकीय तपासणी
माहितीच्या आधारे प्रमाणपत्रे सादर केल्याच्या घटना चौकशीअंती उजेडात येत आहेत. त्यातच मागील काही महिन्यांत दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी बोगस अपंग प्रमाणपत्रावर कारवाईचा बडगा उगारल्याने अनेक प्रकार चव्हाट्यावर आले.
शासन निर्णयाने सर्व विभागांना आदेश देवुन आरक्षण, पदोन्नती, विविध शासकीय सवलती यासाठी यूडीआयडी कार्ड अनिवार्य केले आहे. तसेच ज्या दिव्यांगांकडून वेळेत युआयडी कार्ड सादर केले नाही, त्यांच्यावर कारवाई आरंभली आहे. सांगली जिल्हा परिषदेकडेही अशाच युडीआयडी सादर न करणाऱ्यांवर कारवाया करण्यात आल्या असुन त्याबाबतची माहिती लपविण्याचा प्रकार घडल्याची वस्तुस्थिती आहे.
आटपाडीतील शाळा क्रमांक एकमध्ये उपशिक्षक असलेले भास्कर डिगोळे यांनी दिव्यांग
आयडी वेळेत जिल्हा परिषदेकडे सादर न केल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. निलंबन कालावधीत त्यांची नेमणुक खानापूर-विटा पंचायत समिती मुख्यालयात करण्यात आली आहे.
दिव्यांग प्रमाणपत्र युडीआयडीच्या निमित्ताने झालेल्या या कारवाईने प्राथमिक शिक्षकांमध्ये खळबळ उडाली. मुळात सांगली जिल्हयात बोगस दिव्यांग प्रमाणपत्राची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. राज्यात दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी आरंभली असुन यात अनेकांचे धाबे दणाणले आहेत. सांगली जिल्हा परिषदेकडील अनेकजण या कारवाईच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता असुन बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभघेणाऱ्यांवर कारवाई करून खऱ्या दिव्यांगांवरील अन्याय दुर करावा, अशी मागणी होत आहे.
Post a Comment