⚡ ब्रेकिंग News

नगरपंचायतीचाा निर्णय अंगलट; नागरिकांच्या रोषणानंतर महापुरुषांचे फोटो सन्मानाने पुन्हा मूळ जागी

आटपाडी: येथील नगरपंचायतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर थोर महापुरुषांचे फोटो काढून त्या ठिकाणी नगराध्यक्षांचा फलक लावल्याच्या प्रकारामुळे शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. मात्र, नागरिकांचा वाढता रोष आणि विविध संघटनांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने अखेर आपली चूक सुधारली असून, महापुरुषांचे फोटो पुन्हा सन्मानाने मूळ जागी लावण्यात आले आहेत. आटपाडी नगरपंचायतीच्या मुख्य कार्यालयातील दर्शनी भागात असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांचे फोटो होते. हे सारेच फोटो हटवून त्या जागी नगराध्यक्षांचा फलक लावण्यात आला होता. या प्रकाराची माहिती मिळताच शहरातून सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त होऊ लागली. यावर नगराध्यक्ष यु. टी. जाधव यांनी "महापुरुषांचे फोटो नगरपंचायतीच्या मुख्य सभागृहात लावण्यात येतील," असे सांगत आपल्या कृतीचे समर्थन केले होते. मात्र, नगराध्यक्षांच्या या स्पष्टीकरणाने ज्येष्ठ नागरिकांचे आणि कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही.
घटनेचे गांभीर्य ओळखून काँग्रेसचे डी. एम. पाटील, मोहनराव देशमुख आणि 'मावळा ग्रुप'च्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव हजारे यांची भेट घेतली. महापुरुषांचा फोटो हटवणे हा त्यांचा अवमान असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आणि तीव्र नाराजी नोंदवली.
शहरातील वातावरण आणि भावनांची दखल घेत मुख्याधिकारी वैभव हजारे यांनी तातडीने पावले उचलली. त्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेत ज्या ठिकाणाहून महापुरुषांचे फोटो हटवण्यात आले होते, त्याच मूळ जागी ते पुन्हा लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार, आता छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांचे फोटो पुन्हा दिमाखात झळकू लागल्याने आटपाडीकरांनी समाधान व्यक्त केले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...