आटपाडी ता. 11 : लग्न करून सोन्याचे
दागिने घेवुन पळून गेलेल्या नवरीसह फसवणूक करणाऱ्या दोन एजंटांना आटपाडी पोलिसांनी अटक केली.
धक्कादायक प्रकार म्हणजे देशमुखवाडीतील नवनाथ देशमुख याला गंडा घालणाऱ्या या तरुणीने यापुर्वी तीन लग्ने करून असाच गंडा घालून धूम ठोकल्याचे उघड झाले. देशमुखवाडी येथील नवनाथ देशमुख याचे 24 मार्चला वर्षा संभाजी शेवाळे ऊर्फ बेगम दस्तगीर शेख (वय २४ रा. विजयनगर, कराड) हिच्यासोबत एजंट सचिन बाबर याने लग्न लावून दिले. त्यासाठी त्याने 21 हजार रूपये घेतले. लग्नानंतर नवऱ्याच्या घरातून दागिने, रक्कम
घेवुन पळुन गेली. याची आटपाडी
पोलीसात फिर्याद दिली. त्याचा तपास करताना ही टोळी असल्याने उघड झाले. या प्रकरणी वर्षा संभाजी शेवाळे ऊर्फ बेगम दस्तगीर शेख (रा. विजयनगर कराड), सचिन हणमंत बाबर (रा. देवापुर ता.माण), अश्विनी संदीप जाधव (सातारा), संतोष सदाशिव कुलकर्णी (रा.कडेगाव), गणपत गोविंद जाधव (रा. शाळगांव), शकुंतला गरुड (रा.कडेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील तिघांना अटक केली तर तिघे पसार आहेत. या नवरीने यापुर्वी तीन लग्ने केल्याचे आणि तेथे असाच गंडा घालुन धुम ठोकल्याचे
निष्पन्न झाले आहे.
पहिले लग्न युवराज शेवाळे याचे सोबत झाले. दुसरे लग्न गणेश लखन मोरे, (रा. वेताळवाडी ता.पाटण) याच्यासोबत ६-१०-२०२५ रोजी झाले. तेथुन १९-१०-२०२५ रोजी पलायन केले. त्याची मल्हारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर ती मानलेली मावशी अश्विनी जाधव हिच्यासोबत सातारा येथे गेली.
त्यानंतर अश्विनी जाधव, संतोष सदाशिव कुलकर्णी, गणपत गोविंद जाधव, शकुंतला गरुड यांनी संगनमत करुन
लग्न नोटरी करून गणेश पोळ याच्यासोबत लावून दिले. तेथेही अशीच फसवणूक केली. देशमुखवाडीतुन पळुन गेल्यानंतर भादोले गाठले. तेथे अंकुश पाटील यांचे ओळखीचा फायदा घेऊन त्यांच्या घरातील लोकांना भावनिक करुन आणि विश्वास संपादन करुन अंकुश सोबत १० एप्रिल रोजी लग्न करण्याचे ठरले होते. आटपाडी पोलीसांनी सोन्याचे मंगळसुत्र, पैंजण, १ लाख १० हजाराची रोकड हस्तगत केली.
लग्नाचे अमिष दाखवुन पैसे घेवुन एजंटगिरी करणाऱ्यांसह नवरी आणि तिच्या सहकाऱ्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आटपाडी पोलीसांना यश आले आहे. लग्नापासून वंचित असलेले सावज शोधून एजंटांच्या माध्यमातून पैसे घेऊन संगनमताने नवऱ्याच्या घरातील दागिने घेवुन पोबारा करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. देशमुखवाडी येथे गंडा घातल्यानंतर सदर एजंट आणि नवरीकडून फसवणूक झालेल्यांनी आटपाडी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी केले आहे.
Post a Comment