शक्तीपीठ महामार्गत महत्त्वपूर्ण बदल केले असून राज्य सरकारने नव्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. या बदलांमुळे आता महामार्गाची लांबी वाढून तब्बल 856 किमीपर्यंत जाणार आहे, तसेच प्रकल्पाचा खर्चही 80 हजार कोटींवरून 1 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
1 एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या सुधारित आराखड्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला. नव्या नियोजनानुसार महामार्गाची लांबी सुमारे 54 किमीने वाढवण्यात आली असून, काही जिल्ह्यांमधील मार्गात तांत्रिक बदल करण्यात आले आहेत.
साताऱ्याचा समावेश, गोंदवले-शिखर शिंगणापूर मार्गे जाणार रस्ता :
नव्या आराखड्यात सर्वात मोठा बदल म्हणजे सातारा जिल्ह्याचा समावेश. आता हा महामार्ग साताऱ्यातील गोंदवले आणि शिखर शिंगणापूर या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांमधून जाणार आहे. या भागात सुमारे 40 किमी लांबीचा महामार्ग विकसित केला जाणार आहे.
या बदलामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. विशेषतः सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार असून, गोव्यापर्यंतचा प्रवास अधिक जलद CRआणि सोयीस्कर होईल. तसेच नांदेड, हिंगोली, परभणी आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील मार्गांमध्येही काही बदल सुचवण्यात आले आहेत. महामार्ग केवळ वाहतुकीसाठी नसून धार्मिक पर्यटनाला चालना देणारा मोठा प्रकल्प मानला जात आहे. पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिर यांसारख्या एकूण 21 धार्मिक स्थळांना हा महामार्ग जोडणार आहे.
वर्धा, यवतमाळपासून सुरू होणारा हा महामार्ग नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूरमार्गे थेट सिंधुदुर्ग (Sindhudurg) पर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या चारही विभागांना जोडणारा हा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे.
Post a Comment