शेटफळेचे ग्रामदैवत श्री. सिद्धनाथ यात्रा १० व ११ एप्रिल रोजी होणार आहे. १० तारखेला पालखी, छबीना, रथ व सासन काठयांची मिरवणूक काढण्यात येणार आहे तर ११ तारखेला कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे. यात पाच रुपयांपासून दीड लाख इनामाच्या कुस्त्या होणार आहेत. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन संयोजकाच्यावतीने करण्यात आले आहे.
शेटफळे येथे श्री सिद्धनाथ मंदिर व जोगेश्वरी मंदिर आहे. या दोन्ही देवांची यात्रा दरवर्षी चैत्र वैद्य अष्टमीला होते. यावर्षी श्री सिद्धनाथ अष्टमी यात्रा शुक्रवार १० तारखेला होणार आहे. सकाळी नऊ वाजता सिद्धनाथ जोगेश्वरी विवाह सोहळा होऊनयात्रेला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर लोखंडी सासने नाथ मंदिरातून मिरवणुकीने जोगेश्वरी मंदिरात नेली जाणार आहेत. दुपारी आंबील बोणे, पुरणपोळी, पेढे व भांगेचा गोड नैवेद्य ग्रामवासी मिरवणुकीने देवाला अर्पण करणार आहेत. याशिवाय भाविकभक्त देवाचे नवस फेडण्यासाठी देवाला पोशाख, रोख रक्कम, सोने, चांदी व अन्नदान या स्वरूपात देवाला अर्पण करतात. दुपारी चार वाजता देवाची पालखी, छबिना, रथ व सासनकाठ्यांची मिरवणूक निघणार आहे. यावर लोक चांगभलच्या गजरात गुलाल व खोबऱ्याची उधळण करत असतात तर, रात्री नऊ वाजता करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ग्रामदैवतांची यात्रा असल्याने या गावातील नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असणारे लोक, नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने यात्रेसाठी येत असतात. दोन दिवस गावात मोठ्या प्रमाणात गर्दी असतेदुसरे दिवशी शनिवार ११ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता पारंपरिक भेदिकचा कार्यक्रम होणार आहे तर, सायंकाळी चार वाजता जंगी कुस्त्यांचे मैदान होणार आहे. यामध्ये पाच रुपयापासून १ लाख ११ हजार रुपयांच्या पर्यंतच्या निकाली कुस्त्या होणार आहेत. यामध्ये अनेक नामवंत पैलवानांच्या कुस्त्या नेमण्यात आल्या आहेत. याशिवाय अनेक लहान-मोठ्या कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या निकाली कुस्त्या होणार आहेत. सायंकाळी महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या शेटफळेच्या खिरीच्या महाप्रसादाचे आयोजन केले आहे
Post a Comment