भेडवळ : 370 वर्षांपासूनची असलेली भेंडवळच्या घट मांडण्याची परंपरा आजही कायम आहे. काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सूर्यास्ताच्या वेळी घटमांडणी करण्यात आली व आज सकाळी सूर्योदयावेळी या घटमांडणीचे निरीक्षण करून वर्षभराचे पीक पाणी पाऊस राजकीय व देशाच्या संरक्षण स्थितीबद्दलचे अंदाज जाहीर करण्यात आले. यावेळी भेंडवळ परिसरासह मराठवाडा खानदेश व मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. भेंडवळच्या घटमांडणीतून मिळालेल्या अंदाजानुसार शेतकरी वर्षभराचं आपल्या पीक पाण्याचे नियोजन करत असतात. भेंडवळची घटमांडणी ही स्थानिक परंपरा असून अनेक शेतकरी त्यावर विश्वास ठेवत असतात "एबीपी माझा" मात्र भेंडवळच्या घटमांडणीतून निघालेल्या अंदाजाची पुष्टी करत नाही. *यंदाच्या गट मांडणीतून निघालेले प्रमुख निष्कर्ष*
पिकांवर रोगराईचं प्रमाण जास्त असेल.
कापूस, तांदूळ पिकाचे उत्पन्न भरपूर.
ज्वारी , तूर, मुंग, उडीद, मटकी, जवस, वाटाणा ही पिके सर्वसाधारण असतील.
तीळ, बाजरी हे पीक भरपूर येईल.
देशाची संरक्षण स्थिती तणावात असेल
राजा कायम असेल...
देशाची आर्थिक स्थिती मजबूत राहणार नाही.
पाऊस जूनमध्ये भरपूर, जुलै सर्वसाधारण, ऑगस्ट, सप्टेंबर कमी असेल...
अनेक भागात महापुरामुळे नुकसान होणार. घटमांडणी नेमकी कशी करतात? (Bhendwal Bhavishyvani 2026)
भेंडवळच्या घटमांडणीची परंपरेनुसार एक विशिष्ट पद्धत आहे. शेतात मध्यभागी खोल खड्डा करुन त्या खड्ड्यात मातीचा घट मांडण्यात येतो. घटात चार मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर आणि घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोई, कुरडई ठेऊन घटाच्या बाजूला पान सुपारीसह विविध 18 प्रकारची धान्ये मांडली जातात. घटाच्या वर्तुळाकार अठरा धान्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा ही धान्ये मांडली जातात. अंदाज आणि भाकिते कशावरून व्यक्त केली जातात?.
घटामध्ये रात्रभर होणाऱ्या नैसर्गिक बदलाचे पहाटे सूक्ष्म निरीक्षण केले जाते. हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पाऊस, हवामान, पीक, अर्थव्यवस्था तसेच देशाचे राजकीय तथा नैसर्गिक संकटाबाबत चाहूल देणारे भाकीत वर्तवण्यात येते. या भविष्यवाणीवर शेतकऱ्यांचा अतुट विश्वास आहे. या भाकिताचा आधार घेऊन ते आपल्या पिकपाण्याचे नियोजन करत असतात. मातीच्या ढेकळावरून चार महिन्यांच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. विविध धान्यांवरून आगामी हंगामातील पिके कसे राहतील, हे सांगण्यात येते. चारा-पाणीसाठी सांडाई, कुरडई, तर पुरी निसर्गाशी संबंधित राहते. करंजीवरून देशाची आर्थिक परिस्थिती सांगण्यात येते. भादली हे रोगराईचे, तर पान-विडा राजाच्या गादीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. राजा म्हणजे पंतप्रधान. पान, विड्यात होणाऱ्या बदलावरून भविष्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले जाते. मसूर हे पीक परकीय घुसखोरीचे द्योतक आहे.
Post a Comment