तळेवाडी : प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाणारे आणि गावच्या सार्वजनिक कार्यात नेहमीच अग्रभागी असणारे तळेवाडीचे युवक गोरख सरक यांच्या आकस्मिक अपघाती निधनाने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. सरक कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखाच्या डोंगरात त्यांना धीर देण्यासाठी आणि आर्थिक आधार देण्यासाठी संपूर्ण तळेवाडी आणि शेजारचे पात्रेवाडी गाव एकत्र आले. गावकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेत तब्बल ४ लाख २० हजार रुपयांचा निधी गोळा करून सरक यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द केला असून, या माध्यमातून गावाने अनोखी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
गोरख सरक अल्पभूधारक शेतकरी होते. पात्रेवाडी येथे दूध घालण्यासाठी गेले होते. दूध घालून परतत असताना समोरून आलेल्या एका भरधाव गाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात गोरख यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अचानक जाण्याने सरक कुटुंबाचा मुख्य आधार हरपला असून संपूर्ण कुटुंबावर मोठी कुऱ्हाड कोसळली. गोरख यांचे माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले होते. त्यानंतर ते गावाकडे आले आणि शेती करू लागले. अत्यंत कष्टाळू असलेल्या गोरख यांना बैल संगोपनाचा छंद होता. चिंचणीच्या मायाक्का यात्रेला ते आपल्या बैलांना सुंदर सजवून अभिमानाने घेऊन जात असत. गावचा कोणताही सामाजिक उपक्रम असो वा सार्वजनिक कार्य, गोरख त्यात हिरीरीने सहभाग घेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. अत्यंत गरिबीतही त्यांच्या मोठ्या मुलीने नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत गावात प्रथम क्रमांक पटकावून वडिलांचे नाव उंचावले होते. मात्र, हा आनंद साजरा करण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
गोरख यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याचे पाहून गावकऱ्यांचे मन हेलावले. "गोरखने नेहमी गावाला मदत केली, आता आपण त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे," या भावनेतून तळेवाडी आणि पात्रेवाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत आर्थिक मदत गोळा करण्याची मोहीम राबवली. या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेजारच्या पात्रेवाडी गावातून पन्नास हजार तर तळेवाडी गावातून तब्बल ३ लाख ७० हजार रुपयांची मदत जमा झाली. दोन्ही गावांमधून एकूण ४ लाख २० हजार रुपयांचा हा निधी सरक कुटुंबाच्या भविष्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्याकडे सुपूर्द केला.
Post a Comment