खानापूर/विटा : खानापूर-विटा परिसरातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राला महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र, सद्यस्थितीत उपकेंद्रासाठी तात्पुरती इमारत उपलब्ध नसणे ही मोठी अडचण ठरत होती. यावर स्थानिक आमदार सुहास (बाबर) यांनी तातडीने पुढाकार घेतला आहे. विटा येथील टेंभू जलसंपदा विभागाच्या रिक्त इमारतीचा वापर विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी तातडीने सुरू करावा, अशी आग्रही मागणी आमदार बाबर यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहेशासनाने या उपकेंद्रासाठी १४१ कोटी रुपयांचा भरघोस निधी आणि खानापूर येथील गायरान जमीन मंजूर केली आहे. परंतु, मुख्य प्रशासकीय इमारत आणि प्रत्यक्ष शैक्षणिक कामकाज तात्काळ सुरू करण्यासाठी एका सुसज्ज वास्तूची गरज आहे. विट्यातील टेंभू विभागाच्या इमारती सध्या रिकाम्या किंवा अंशतः वापरात असल्याने, या जागा उपकेंद्राला मिळाल्यास विद्यापीठाचे कामकाज कोणतीही वाट न पाहता तातडीने सुरू होऊ शकते, असा विश्वास आमदार बाबर यांनी व्यक्त केला आहे.खानापूर-विटा या दुष्काळी भागात उच्च शिक्षणाची गंगा यावी, यासाठी दिवंगत नेते अनिलभाऊ बाबर यांनी २०१३ पासून अविरत पाठपुरावा केला होता. त्यांच्या पश्चात या भागातील शैक्षणिक क्रांतीचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमदार सुहास बाबर यांनी विधिमंडळासह सर्व स्तरावर सातत्याने आवाज उठवला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून आता प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यासाठी टेंभूच्या इमारतीचा पर्याय अत्यंत सोयीचा ठरणार आहे.सध्या सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि विद्यापीठाच्या प्रशासकीय कामांसाठी कोल्हापूर मुख्य केंद्रात जावे लागते. या उपकेंद्रामुळे खानापूर, आटपाडी, जत, तासगाव आणि कडेगाव तालुक्यातील हजारो ग्रामीण व दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना विटा येथेच सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील
शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी विट्यातील 'टेंभू'ची इमारत द्या; आमदार सुहास बाबर यांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी
पॉलिटिक्स 24 न्यूज
0
Post a Comment