आटपाडी - विटा - लेंगरे - खरसुंडी- नाझरे या प्रशस्त सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम संथगतीने आणि गावात कामाच्या ठिकाणी पाणी मारले जात नसल्याने ज्या ज्या गावातून रस्ता गेला आहे ते गावकरी धुळीने त्रस्त झाले आहेत. किमान ज्या गावात काम सुरू आहे तेथे नियमित पाणी मारून धुळीचा बंदोबस्त करावा अशी, या लोकांची मागणी आहे. विटा ते नाझरा या रस्त्याचे प्रशस्त रुंदीकरण करण्याचे काम अनेक दिवसापासून सुरू आहे. हा रस्ता विटा येथून लेंगरे मार्गे वलवण, चिंचाळे, खरसुंडी, बनपुरी आणि तडवळे या आटपाडी तालुक्यातील गावातून जातो आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी दोन्ही बाजूने पूर्ण रस्ता खुदाई करून उघडला आहे. काही ठिकाणी एका बाजूने सिमेंट काँक्रीट चे काम पूर्ण झाले आहे तर दुसऱ्या बाजूने खडी करून सुरू आहे. मुरमाचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. रस्ता दोन्ही बाजूने खुदाई केल्याने मुरूम मातीचे ढीग रस्त्याच्या बाजूने पडले आहेत. रस्त्यावरही धुळीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याचे रुंदीकरण, अतिक्रमण हटवणे आणि गावालगतच्या गटारींची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. त्यामुळे ज्या गावातून हे रस्ते गेले आहेत त्या रस्त्याच्या दुतर्फा असलेले दुकान आणि नागरिकांना प्रचंड धुळीच्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहेत. उन्हाचा वाढलेला कडाका आणि सोसायट्याचा वारा यामुळे रस्त्यावरील धूळ दुकानात आणि घरात शिरते. लोकांना त्रास होऊ नये म्हणून काम सुरू असलेल्या गावातील ठिकाणी ठेकेदाराकडून पाणी मारलं जात नाही. त्यामुळे धुळीचे साम्राज्य वाढले आहे. ज्या गावातून रस्ते केले आहेत तेथील स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता केलेल्या खरसुंडी बनपुरी या गावात रस्त्यावरील धुळीचे प्रचंड साम्राज्य पसरले असून, यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्याची खुदाई करून तो पुन्हा भरला जात आहे, मात्र या प्रक्रियेत पाण्याचा शिडकावा पुरेसा केला जात नसल्याने प्रचंड धूळ उडत आहे. खरसुंडी हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आणि व्यापारी केंद्र असल्याने येथे भाविक, पर्यटक आणि बाजारकरी यांची मोठी वर्दळ असते. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे उडणारी धूळ थेट घरात आणि दुकानात शिरत असल्याने श्वसनाचे विकार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे की, रस्ते विकास आणि गटारींची कामे भविष्यात फायदेशीर ठरणार असली, तरी सध्याच्या स्थितीत होत असलेला त्रास असह्य आहे. कामाला अपेक्षित वेग मिळत नसल्याने ठिकठिकाणी खड्डे आणि राडारोडा पडलेला आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून लहान-मोठे अपघातही घडत आहेत. आमदार सुहास बाबर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या लक्ष देऊन संबंधित ठेकेदाराला किमान गावातील कामांना तातडीने गती देण्याच्या सूचना देण्याची मागणी केली आहे. तसेच कामाच्या ठिकाणी नियमित पाण्याचा शिडकावा करावा आणि रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून जनतेला दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. फोटो -1) खरसुंडी तालुका आटपाडी गावातून गेलेल्या विटा ते नाझरे रस्त्याचे रखडलेले काम.
रस्त्याचे काम संथ, धुळीने नागरिक रडकुंडीला
पॉलिटिक्स 24 न्यूज
0
Post a Comment