⚡ ब्रेकिंग News

बापाची शिक्षा, पोटच्या मुलीच्या जिवावर बेतली

आटपाडी ता. 26 - बनपुरी ता . आटपाडी चुलत्याच्या घरात किरकोळ चोरी केल्याच्या संशयावरून एका नराधम बापाने आपल्या दोन पोटच्या मुलींचे हातपाय बांधून त्यांना तब्बल दोन रात्री आणि एक दिवस घराच्या तुळईला लटकवून ठेवले. या अमानुष छळात नऊ वर्षांच्या ऋतुजा उर्फ सानिका दादू यमगर या चिमुकलीचा मृत्यू झाला, तर ११ वर्षांची अनुजा ही मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. दरम्यान, आटपाडी पोलिसांनी बापाला चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित दादू उर्फ नाना यमगर (वय ३८) याला पाच मुले असून त्यात चार मुली व एक मुलगा आहे. चुलत्याच्या घरात चोरी केल्याचा संशय दादूला आपल्या दोन मुलींवर दोन दिवसांपूर्वी आला होता. त्याची मुलीकडे चौकशी केली. मात्र मुली कबूल झाल्या नाहीत. या रागातून त्याने ऋतुजा आणि अनुजा या दोघींचे हातपाय बांधले आणि त्यांना घरातील छताच्या तुळईला अडकवून ठेवले. धक्कादायक बाब म्हणजे, मुली वर टांगलेल्या असताना आरोपी बाप आणि आई त्यांच्या खालीच झोपत होते. 
तब्बल 36 तास या दोन्ही मुली लटकलेल्या अवस्थेत होत्या. त्यांचे डोके खाली आणि पाय वर होते. त्यांनी वारंवार सोडण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी बापाकडे विनवणी केली. मात्र, पाषाणहृदयी बापाने त्यांना पाण्याचा थेंबही दिला नाही. काल रात्री मुलींच्या आजोबांनी त्यांना सोडण्याचा आणि पाणी देण्याचा आग्रह केला तरीही बापाला पाझर फुटला नाही. त्याने स्वतःच्या वडिलांनाही टिकावाच्या दांडक्याने मारहाण केली. दरम्यान,आज सकाळी दोन्ही मुली बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पाहून त्यांना खाली उतरवण्यात आले. मात्र, तोपर्यंत नऊ वर्षांच्या ऋतुजाचा मृत्यू झाला होता. तर अनुजा ही बेशुद्ध असल्याने तिला तातडीने आटपाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. इकडे गावात मृत ऋतुजावर अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच, शुद्धीवर आलेल्या अनुजाने घडलेला सर्व प्रकार डॉक्टरांना सांगितला. त्यानंतर या भयानक कृत्याचा पर्दाफाश झाला.
या घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नराधम बाप दादू यमगर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. किरकोळ कारणावरून जन्मदात्यानेच आपल्या लेकीचा जीव घेतल्याने संपूर्ण आटपाडी तालुक्यात प्रचंड संताप आणि खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. फोटो -1) मयत ऋतुजा यमगर २) बाप दादू यमगर

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...