आटपाडी - खरसुंडी ता. आटपाडी येथील प्रसिद्ध श्री. सिद्धनाथ मंदिरातील सहा खांबांवर भाविकांनी अर्पण केलेली 181 किलो चांदी सध्या नसल्याचा गंभीर आरोप ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख शेखर निचळ यांनी केला आहे. देवस्थान ट्रस्टने ही चांदी कोणाच्या अधिकाराने आणि कुठे दिली, याचा खुलासा करून सर्व 181 किलो चांदीचा हिशोब द्यावा आणि ती तात्काळ पुन्हा बसवावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वतः भेटून तक्रार करणार असल्याचा इशारा दिला आहे.
खरसुंडी ता. आटपाडी येथील मंदिरातील खांबावर भाविकांनी बसवलेल्या चांदीवर उलट सुलट चर्चा सुरू आहे. गेल्या महिन्यात देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी यांनी 15 डिसेंबर पर्यंत सर्व चांदी मंदिरात बसवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर ही मंदिरात चांदी बसवलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर शेखर निचळ यांनी पत्रकार परिषद घेऊन देवस्थान ट्रस्टवर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, मंदिरातील सहा दगडाच्या खांबांवर भाविकांनी स्वखर्चाने चांदीचे नक्षीकाम केले होते. मागील चार खांबांवर वेजेगाव येथील पिंटू देवकर, जनार्दन, हणमंत आणि नागेश देवकर या चार भाविकांनी 130 किलो चांदी बसवली होती तर पुढील दोन खांब आणि प्रवेशद्वारावर वेजेगाव येथील बालाजी देवकर आणि देवीखिंडी येथील शिवाजी पाटील या दोनभाविकांनी 51 किलो चांदी अर्पण केली होती. सहा महिन्यांपूर्वी मागील चार खांबांवरील चांदी काढण्यात आली. त्याची कुठेही कसलीही ट्रस्टने माहिती दिलेली नाही. ही चांदी 130 किलो ऐवजी 90 किलोच असल्याचे सांगितले जाते मग उर्वरित 40 किलो चांदीचा फरक का पडतोय? असा सवाल निचळ यांनी उपस्थित केला आहे. तसेच पुढील खांबांवरील 51 किलो चांदीपैकी केवळ 24 किलो चांदी 2 मार्च रोजी देवीखिंडीचे भाविक शिवाजी पाटील यांना फक्त दाखवण्यात आली. यातीलच दुसरी 24 किलो चांदी बालाजी देवकर यांच्याकडे असल्याचे ट्रस्ट सांगते. यातही मोठ्या प्रमाणावर तफावत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.". ते म्हणाले,"
डिसेंबर महिन्यात दान दिलेले भाविक दर्शनासाठी आले असता खांबावर चांदी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ट्रस्टकडे चौकशी केली. त्यांना सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली आणि नंतर केवळ एका पत्राच्या आधारे चांदी हुपरीच्या कारागिराला दिल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी सतत पाठपुरवठा केला. त्यांना खेळवत ठेवले. 28 फेब्रुवारीला ट्रस्टचे अध्यक्षांनी हात वर केले शेवटी पाटील आक्रमक झाल्यावर त्यांना नवीन 24 किलो चांदी दोन मार्चला दाखवली आहे. ती कोठून आणली. मुळात भाविकांनी देवाला दान दिलेली वस्तू ट्रस्ट केवळ पत्राच्या आधारे कोणाला परत कशी देऊ शकते?. असा आक्रमक सवाल शेखर निचळ यांनी केला आहे. ट्रस्टचे हात बरबटलेले आहेत. त्यांच्या कामकाजाची अनेक प्रकरणी आहेत या संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हा प्रश्न मांडणार असल्याचे सांगितले. कोट-पुढच्या दोन्ही खांबावरची 24 किलोच चांदी भरली आहे. ती देणगी देणाऱ्या दोन्ही भाविकांना एकत्र बोलवून त्यांच्यासमोर लवकर बसवणार आहे. मागच्या सहा खांबावरील चांदी दान दिलेल्या चौघांनी नेहली आहे. त्याच्या वजनात घट आली आहे. यात आमचा काहीही संबंध नाही. - चंद्रकांत पुजारी (श्री. सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट खरसुंडी)
Post a Comment