आटपाडी - बंद पाईपने पाणी देण्यासाठी सुरु असलेली कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत.ती तातडीने वेगाने करा, अन्यथा तहसील कार्यालयासमोर समोर 7 मे पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा श्रमिक मुक्तीदलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. येथील मारुती मंदिरात आटपाडी तालुक्यातील टेंभूच्या पाण्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी डॉ. पाटणकर यांनी वंचित गावात सुरू असलेल्या कामांचा शेतकऱ्याकडून आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले," आटपाडी तालुक्यातील टेंभू योजनेच्या आराखड्यातून २१ गावे वगळली होती. या गावांचा समावेश करण्यासाठी श्रमिक मुक्ती दल- समन्यायी पाणी वाटप, पाणी संघर्ष चळवळीने मोठा संघर्ष केला. यातून आटपाडी, सांगोला व तासगाव तालुक्यात समान पाणी वाटप पथदर्शी प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. काम झालेला मुख्य कालवा सोडून पूर्णपणे बंद पाईपणे पाणी दिले तर पाण्याची बचत होते. तेच पाणी तालुक्यातील सर्व गावांच्या सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व शेतीला पाणी मिळणे शक्य असल्याचे सिद्ध झाले. कामे पूर्ण झालेल्या गावांना पाणी दिले जाते. परंतु वंचित असलेल्या गावांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. त्यामुळे पाणी मिळण्यास उशीर होत आहे. यामुळे शेतकऱ्यात असंतोष असून ते लढा उभारण्यासाठी सज्ज आहेत." प्रास्ताविक व स्वागत किरण लोहकरे यांनी केले. यावेळी के. जे. जॉय, जनार्धन झिंबल, नेहा भडभडे, विष्णुपंत पाटील, महादेव कदम, उमेश लेमटे, यांची भाषणे झाली. पाणी वापर संस्थेचे विलास गायकवाड यांनी पाटबंधारे विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केल्या.
यावेळी अमोल माने, भीमराव यमगर, पोपट गाढवे, तुकाराम बंडगर, दत्तात्रय पुजारी, प्रसंशा शिरकांडे, प्रतीक्षा चिंचाकर, माऊली गळवे, हर्षद गळवे, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. फोटो:१) आटपाडी टेंभूच्या पाण्यापासून वंचित असलेल्या गावातील शेतकऱ्यांच्या बैठकीत डॉ. भारत पाटणकर यांनी मार्गदर्शन केले.
Post a Comment