सांगली
विशेषवृत्त
सांगली – महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अनेक नाट्यमय वळणे आली, परंतु स्व. वसंतदादा पाटील यांनी घेतलेला ‘राजसंन्यास’ आणि त्यानंतर त्यांनी केलेले पुनरागमन ही घटना आजही तितकीच प्रेरणादायी आणि महत्त्वाची मानली जाते. एका बाजूला सत्तेचा त्याग करण्याची धमक आणि दुसऱ्या बाजूला पक्षाच्या पडझडीत खंबीरपणे उभे राहण्याची जिद्द, अशा दोन टोकाच्या भूमिका दादांनी पार पाडल्या होत्या.
१९७६ च्या सुमारास वसंतदादा पाटील तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे मंत्री म्हणून कार्यरत होते. मात्र, राजकीय मतभेद आणि मंत्रिमंडळ पुनर्रचनेत डावलले गेल्यामुळे दादा प्रचंड नाराज झाले. सत्तेपेक्षा स्वाभिमानाला महत्त्व देणाऱ्या दादांनी तात्काळ राजकारणातून ‘राजसंन्यास’ घेण्याची घोषणा केली.
घोषणेनंतर ते मुंबई सोडून आपल्या सांगलीतील पद्माळे या गावी परतले. त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती. . पुढे १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे अपयश आले. राज्यात काँग्रेसचे अवघे २० खासदार निवडून आले होते. आणीबाणीनंतरची ही लाट काँग्रेसच्या अस्तित्वाला आव्हान देत होती. अशा कठीण प्रसंगी कार्यकर्त्यांनी दादांना पुन्हा सक्रिय होण्याची विनंती केली. तेव्हा “काँग्रेसचे घर जळत असताना मी गप्प कसा बसू?” हे ऐतिहासिक उदगार काढत दादांनी आपला संन्यास मागे घेतला. त्यांनी आपल्या संन्यासाची वस्त्रे कृष्णेच्या पात्रात विसर्जित केली आणि पुन्हा राजकारणात सक्रिय झाले.
पुनरागमनानंतर लगेचच १७ एप्रिल १९७७ रोजी वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली विखुरलेला काँग्रेस पक्ष पुन्हा एकवटला. प्रतिकूल परिस्थितीत पक्षाला सावरण्याचे मोठे काम करून दाखवले.
वसंतदादांचा हा प्रवास केवळ सत्तेसाठी नसून पक्षनिष्ठा आणि जनसेवेसाठी होता, हेच या घटनेतून अधोरेखित होते. आजही जेव्हा राजकीय अस्थिरता निर्माण होते, तेव्हा दादांच्या या निस्पृह वृत्तीची आठवण काढली जाते
Post a Comment