जेव्हा अवघा महाराष्ट्र धुळवडीच्या धिंगाण्यात व्यस्त असतो तेव्हा विभूतवाडीच्या शिवारात वेगळाच सुगंध दरवळ असतो. तो तुळशीच्या माळेचा आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा असतो. गेल्या साडेचार दशकांपासून धुलवडीचा धिंगाणा नाकारून हरिनाम सप्ताह साजरा करून विरक्तीचा मार्ग स्वीकारणाऱ्या गावाने मातीतील 'संस्कार' आणि 'संस्कृती' काय असते, याच उदाहरण जगासमोर ठेवले आहे. विभूतवाडी ता. आटपाडी केवळ ३,००० लोकसंख्येचे छोटेसे गाव नाही, तर आज एक विचारपीठ बनले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने अनेक कष्टकरी हातांना पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई-पुण्याच्या गर्दीत जावे लागले. मात्र, 'अखंड हरिनाम सप्ताह' हा या गावाचा असा भावनिक सांधा आहे, जो शहरात गेलेल्या प्रत्येक चाकरमान्याला गावच्या मातीकडे ओढून आणतो. "पोटासाठी शहर असले तरी, मनाच्या शांतीसाठी आमची विभूतवाडीच आहे," अशी भावना येथील ग्रामस्थांच्या डोळ्यांतून ओसांडून वाहते आहे.
धार्मिकतेचा खरा अर्थ केवळ पोथी वाचणे नसून स्वतःच्या इंद्रियांवर ताबा मिळवणे होय, हे या गावाने सिद्ध केले आहे. सप्ताहाच्या सात दिवसांत गावाच्या सीमा जणू 'व्यसनमुक्तीचे मंदिर' बनतात. ज्या हातांना श्रमाची सवय आहे, ते हात या काळात मदिरेला स्पर्शही करत नाहीत. घरातील चुलीवर मांसाहार शिजत नाही. ही केवळ बंदी नसून, गावाने श्रद्धेपोटी घेतलेला तो एक सामूहिक 'संकल्प' आहे. विशेष म्हणजे या काळात धुळवड येते पण गावकरी ती साजरी करत नाहीत. 1981 मध्ये पेरलेले आध्यात्मिक बीज आज एका वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. पहाटेच्या थंड हवेत जेव्हा काकड आरतीचे सूर कानी पडतात, तेव्हा दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्याच्या मनाला उभारी मिळते. ज्ञानेश्वरीचे पारायण आणि सायंकाळचा तो विठ्ठल नामाचा गजर गावाला पंढरीच्या वाळवंटाची अनुभूती देतो. यंदा 26 फेब्रुवारीला सुरू झालेल्या या भक्ती सोहळ्याची सांगता 5 मार्चला 'तुकाराम बीजे'च्या पावन मुहूर्तावर होत आहे. गावातून पालखी आणि रथ फिरतो, तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यांत श्रद्धेचे पाणी असते. "आम्ही रंगाने खेळत नाही, आम्ही नामस्मरणात न्हाऊन निघतो," हा येथील तरुणाईचा अभिमान आजच्या पिढीसाठी दिशादर्शक ठरत आहे.
Post a Comment